कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचा शोध मोहीम 1 एप्रिल ते 31 मे 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार व खोटी माहिती दिल्यास संबंधितावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. असे कळंब पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी शिल्पा माळवे यांनी माहिती दिली आहे.
या मोहिमे अंतर्गत ज्याचे उत्पन्न अधिक आहे अथवा ज्यांना ज्या पत्त्यावर शिधापत्रिका देण्यात आलेले आहे ते त्या पत्त्यावर राहत नसतील तर अशा लाभार्थ्याचा शोध मोहिमेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. तसेच अशा ठिकाणी लाभार्थ्याचा मृत्यू झालेला आहे तरीही त्याच्या नावाने धान्य उचलले जात आहे. त्यामुळे अशा मृत लाभार्थ्याचा नावेही मोहिमेत वगळली जाणार आहेत. यासाठी लाभार्थ्याकडून आता पुरवठा विभागाकडून एक फार्म भरून घेणार आहेत. यामध्ये 'अ ' आणि ' बं 'अशी वर्गवारी करून या आलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. यामध्ये त्रुटी अथवा चुकीची माहिती आढळल्यास त्यांची शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे. गरीब तसेच गरजूंना अन्नधान्याची गरज असते. मात्र काही नागरिक आर्थिक सक्षम असतानाही रेशनचे धान्य उचलत असल्यामुळे आता शासनाने पडताळणी सुरू केली आहे. यामुळे ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांना या मोहिमेनंतर आपला रेशन धान्या वरील अधिकार सोडावा लागणार आहे.
यामध्ये कळंब तालुक्यात एकुण रास्त भाव दुकाने- 143, एकूण कार्ड संख्या- 42195, एकूण सदस्य संख्या- 188651, अंत्योदय कार्ड संख्या- 5324, अंत्योदय सदस्य संख्या- 26455, प्राधान्य कुटुंब लाभार्थी कार्ड संख्या- 30161, प्राधान्य कुटुंब सदस्य संख्या- 136678, शुभ्र कार्ड - 3191, शुभ्र सदस्य संख्या- 13553, अपात्र कार्ड संख्या- 3519, अपात्र सदस्य संख्या- 11965 अशी कळंब तालुक्यातील कार्ड व सदस्य संख्या आहे. या मोहिमेमुळे अनेक कार्ड व सदस्य संख्या कमी होणार आहे. अशी माहिती कळंब पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी शिल्पा माळवे यांनी सांगितले आहे.
पुरवठा विभागाकडून होणार पडताळणी
पुरवठा विभागाने आता अन्नसुरक्षा अथवा अंत्योदय योजनेत धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःहून लेखी फार्म भरून देण्याचे आवाहन केले आहे. हे आलेले फॉर्म स्वस्त धान्य दुकानदार खात्री करून पुरवठा विभागाला कळवणार आहेत. त्यानंतर पुरवठा विभाग त्याची पडताळणी करेल. यामध्ये अधिक उत्पन्न आढळल्यास शिधापत्रिका थेट रद्द केली जाणार आहे. तसेच अंत्योदय, प्राधान्य, एपीएल तसेच शुभ्र कार्डधारकांची संख्या मोठी आहे. यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना रेशनच्या धान्याचा लाभ रेशन दुकानाच्या माध्यमातून मिळणार आहे.
कळंब पुरवठा निरीक्षण अधिकारी - शिल्पा माळवे