धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरासह जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी जयंतीनिमित्त निळे ध्वज, कमानी लावण्यात आली होती. शहर व जिल्ह्यात विविध भागात विशेष व्यासपीठ उभारून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तर धाराशिव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार मृनाल जाधव, धनंजय शिंगाडे यांच्यासह विविध पक्षातील व समाजातील लोक मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर चौकात जमले होते. यावेळी बौध्दवंदना घेण्यात आली.
धाराशिव शहरात प्रवेश करताच बार्शी नाका, महात्मा फुले चौक, धुळे-सोलापूर रोड, वैराग-तुळजापूर रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. निळे झेंडे, होर्डिंग लक्ष वेधत आहेत. भाजपचे नितीन काळे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिबाळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदी विविध पक्षाचे नेते उपस्थित होते.
भीम सैनिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. मिरवणुकीसाठी मंडळाचे पदाधिकारी तयारीत व्यस्त होते. शहरात एकूण 22 मिरवणूका निघणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील आंबेडकर चौकासह अन्य भागात यंदाही रक्तदान शिबीर, अन्नदान, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. स्वयंसेवी संस्था, विविध मंडळे, राजकीय पक्षांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सकाळपासूनच अभिवादनाचे कार्यक्रम घेतले आहेत. त्यात पोलिसांनी जयंती मार्ग, डीजेच्या आवाजाबाबत सूचना केल्या. आंबेडकरी अनुयायांनी दुचाकी, चारचाकी वाहनांसह घरांवर निळे ध्वज लावले आहेत. क्रांती चौक, मारवाड गल्लीपासून काळा मारूती मंदिर चौक ते ताजमहल टॉकीज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून धाराशिव शहर पोलिस ठाणे ते भीमनगर असा मिरवणूक मार्ग आहे.
कृती समितीने उभारलेल्या देखाव्याचे आकर्षण
शहरातील आंबेडकर चौकात फुले-शाहू-आंबेडकर उद्यान कृती समितीतर्फे आकर्षक देखावा उभारला आहे. यात बाबासाहेबांच्या जन्मावेळची झोपडी उभारली असून, त्या कुटीत माता भिमाई व हातात पुस्तक घेवून उभारलेले बालपणीचे बाबासाहेब दिसत आहेत. शेजारी भारताच्या नकाशावर कोहिनूर हिरा व त्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाची प्रतिकृती साकरली आहे. बोधिवृक्षाखाली तथागत गौतम बुध्दांची मृर्ती व दीक्षाभूमी असा एकत्रित देखावा उभारला आहे.