कळंब (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहीत असताना देशातील सर्व घटकाचा विचार केला यासाठी ते सर्व सामान्यांच्या बाजूने उभे राहिले. संविधानामध्ये सर्वसामान्य माणुस केंद्रस्थानी मानला. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराज यांचे धर्मनिरपेक्ष विचार तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळेल याचा विचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यातून जगात ओळख निर्माण केली आहे असे विचार प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर छत्रपती संभाजी नगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती महोत्सव विचार संवर्धन महोत्सव अंतर्गत पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन नगरपरिषद सांस्कृतिक सभागृह मेन रोड कळंब येथे दोन दिवशीय दिनांक 11 एप्रिल व 12 एप्रिल रोजी संपन्न होत असून दिनांक 12 एप्रिल रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय विचार पिठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगंधर व्यक्तिमत्व या विषयावर अध्यक्षीय समारोप करीत असताना व्यक्त केले.

याप्रसंगी विचार पिठावर सहभागी वक्ते प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे लातूर, प्राचार्य आनिगुंठे कळंब  हे होते. याप्रसंगी पुढे बोलताना प्रा. लुलेकर यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म,जाती, पोट जातीतील भांडणे न करता एकत्रित येऊन एकसंघ देश कसा उभा राहील याचा विचार केला. जुनी मानसिकता संपली पाहिजे माणूस म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब यांनी कामगार यांच्यासाठी अधिकार  व कायदे निर्माण केले. त्याचबरोबर महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी कायदे केले. संविधान ज्या दिवशी देशाला मिळाले. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभे केले. तसेच नदीजोड प्रकल्पाची कल्पनाही त्यांनी मांडली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण केले. शोषणाच्या मुक्तीचा विचार फुलेंनी केला.  महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. महाराजांची समाधी शोधून काढली. महात्मा फुलेना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मांनले. यातून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा धागा जोडला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले समाजाला समजले आहेत का ? असा प्रश्न त्यांनी या प्रसंगी केला. याप्रसंगी प्रा. लुलेकर यांनी संविधान सभेतील अनेक विषयावर चर्चा व त्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अभ्यासात्मक निर्णय या विषयी माहिती दिली. या परिसंवादात प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, लातूर यांनी आपल्या व्याख्यानात आज समाजात शांतता आहे ही शांतता मुक्त स्वातंत्र्याची नाही तर गुलामगिरीची आहे कुठल्याही माणसाला न विचारता त्याला बंद करण्याचे कायदे बनवले जात आहे. आपण नेहमी चांगल्या विचाराकरता अस्वस्थ असावे, ज्यांच्याकडे आवाज नाही त्यांचा आवाज बना असे सांगितले. ज्यांनी युग बदलले विचाराने दिशा दिली सर्वसामान्यांच्या हक्कासाठी योगदान दिले म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगंधर, युग बदलणारे ठरतात असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दादाराव गुंडरे, यांनी केले. तर आभार सी. आर. घाडगे यांनी मानले.

 
Top