कळंब (प्रतिनिधी)- साहित्य संमेलनामुळे ग्रामीण भागातील साहित्यिकांना संधी उपलब्ध होत असते. त्यामुळेच साहित्य माणसाचे मन प्रगल्भ करण्याचे काम करते. असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 134 वी जयंती महोत्सव समिती  विचार संवर्धन महोत्सव अंतर्गत पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन समारोप प्रसंगी जगद्गुरु संत तुकोबाराय विचारपीठावरून प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना केले.

कळंब येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन आयोजन केल्याबद्दल कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे यांचे कौतुक केले. त्यांनी या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल आमदार काळे यांनी गौरव उद्गार काढले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आबासाहेब बारकुल उपाध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा हे होते. मंचावर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रा.डॉ. संजय कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील पवार, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, तालुका उपाध्यक्ष ॲड. त्रिंबकराव मनगिरे, ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही. सरवदे, ॲड.शकुंतला फाटक यांची  उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांचा विचार संवर्धन महोत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

आपल्या सत्काराच्या उत्तरातील भाषणात योगीराज वाघमारे यांनी हा सत्कार म्हणजे घरच्या माणसाने पाठीवर मारलेली थाप आहे. तर संमेलनाचे कार्याध्यक्ष  डॉ. संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. आबासाहेब बारकुल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल वाघमारे तर आभार प्रदर्शन संघरत्न कसबे यांनी मांनले.

 
Top