उमरगा(प्रतिनिधी)- तालुक्यातील कसगी येथील पै.मुंतजीर सरनौबत या युवकाने यंदा धाराशिव, अहिल्यानगर व कर्जत जामखेड तिन्ही ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजनी गटातुन विजय संपादन करीत सुवर्णपदक मिळवले आहे.
यापुर्वी हरियाणा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत युवा गटातुनही त्याने विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेले उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी या पैलवानाला पुढील स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्याकडुन चांदीचे कडे भेट देण्याचे जाहीर केले होते.
या अनुषंगाने मंगळवार दि.1 एप्रील रोजी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कसगी गावामध्ये जाऊन पै.मुंतजीर सरनौबत यांचा यथोचीत सत्कार करून त्यांना चांदीचे कडे भेट दिले. यावेळी कसगी ग्रामस्थांच्या वतीनेही या कुस्तीपटुचा सत्कार करण्यात आला. आपल्या भागातील खेळाडुंनी राज्य पातळीवर विजय मिळवणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत यावेळी बोलताना माजी आमदार चौगुले यांनी व्यक्त केले. युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, सरपंच हणमंत गुरव, व्यंकट पाटील, शिवा म्हात्रे, दिलीप बदोले, गोविंद महाराज, सौ.शारदाबाई आलगुडे, दत्ता भोसले, संजय नंदर्गे, संदीप चौगुले, बलवीर राजपुत, नबीसाब मुल्ला, जमीर मुल्ला आदी ग्रामस्थ व कुस्तीप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.