भूम (प्रतिनिधी)- वडिलोपार्जित जमिनीत हक्क मिळावा आणि वारसा हक्काची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी हिवर्डा येथील दत्तात्रय दगडू मुंडे यांनी सोमवारी (28 एप्रिल) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भूम तहसील कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचारी एल. आर. शिंदे व भाजप नेते शंकर खामकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि मुंडे यांचे प्राण वाचवण्यात यश आले.
घटनेनंतर भूम पोलिसांनी त्वरित मुंडे यांना ताब्यात घेऊन भूम ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सध्या स्थिरता असून, पुढील उपचार सुरू आहेत. दत्तात्रय मुंडे यांनी वडिलोपार्जित जमिनीत आपला हक्क मिळावा व मुलांच्या शिक्षणासाठी वारसाहक्काची कागदपत्रे मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, पोलीस महासंचालक छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक धाराशिव, उपविभागीय अधिकारी भूम, पोलीस ठाणे भूम आणि तहसीलदार भूम यांना वेळोवेळी निवेदने दिली होती. अखेर महागाईच्या तुलनेत नोकरी नसल्यामुळे, कुटुंबाचा चरितार्थ भागवण्या एवढे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे वडिलोपार्जित मिळकत मिळावी. या संदर्भात वरिष्ठांना निवेदन दिली. परंतु अद्याप कसल्याही प्रकारचा प्रतिसाद अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाही. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी या टोकाच्या निर्णयाकडे पाऊल उचलले.
याआधीही त्यांनी 10 मार्च 2025 रोजी पासून भूम तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यावरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने मुंडे यांनी संतप्त होऊन आत्मदहनाचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भूम तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून टीका होत आहे. याप्रकरणी पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.