धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तहसील कार्यालयात "Stay Safe Online / Cyber Hygiene" या सायबर सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव आणि तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या हस्ते झाले.

MyGov Campus Ambassador आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभियंता श्री.डी.बी.सलगर यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण,डेटा सुरक्षितता,ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध,तसेच डिजिटल व्यवहारांतील सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत Wi-Fi सुरक्षा,ATM सुरक्षा,SIM क्लोनिंग,आधार पेमेंट सुरक्षितता आणि सायबर बुलिंग संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.याशिवाय, Artificial Intelligence (AI) च्या सहाय्याने कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षम कसे होऊ शकते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

या कार्यक्रमास निवासी नायब तहसीलदार श्री.एम.जी.शिंदे,नायब तहसीलदार (महसूल) विशाखा बलकवडे,नायब तहसीलदार (निवडणूक) श्री.स्वामी आणि नायब तहसीलदार (पुरवठा) अमोल बाहेकर यांची विशेष उपस्थिती होती.नायब तहसीलदार (महसूल) विशाखा बलकवडे यांनी आभार मानले.या प्रशिक्षणानंतर धाराशिव तहसील कार्यालय सायबर सिक्युरिटी अवेअरनेस आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय बनले असून,हा उपक्रम इतर सरकारी कार्यालयांसाठीही आदर्श ठरणार आहे.

 
Top