तुळजापूर (प्रतिनिधी) - विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन अभिषेक पूजा केली. यावेळी त्यांनी परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक घेतली. या बैठकीत न्यायमुर्ती कोचर आयोगाच्या शिफारसीनुसार आराखडा असावा अशी सुचना केली. 

मंदिर संस्थान येथे झालेल्या बैठकीत उपसभापती यांनी प्रस्तावित विकास आराखड्याबाबत सादरीकरण पाहून, इत्यंभूत माहिती घेऊन प्रशासनास सूचना दिल्या. कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विकास आराखड्याची सद्यस्थिती व उच्चाधिकार समितीच्या सुचनांबाबत माहिती घेतानाच आराखड्या बाबत स्थानिक नागरिकांच्या मतांविषयी जाणून घेतले. आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करताना न्यायमुर्ती राजन कोचर समितीचा अहवाल विचारात घ्यावा, दिव्यांग व वृद्धांसाठी विशेष सुविधा तयार करण्याबाबत सूचना दिल्या, सोलर प्लांट उभारताना तेथे वनीकरण व उद्यान तयार करणेबाबत अर्बन फॉरेस्टचे उदाहरण देऊन सूचना दिल्या. पुणे विद्यापीठामध्ये चालू असलेल्या मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाबाबत माहिती देऊन मंदिर कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्याबाबत सुचवले. मंदिर व्यवस्थापनाने प्रसाद व्यवस्था, भक्तनिवास, भाविक सुविधा केंद्र, आरोग्य व्यवस्था, पायी चालत येणाऱ्या भाविकांची व्यवस्था, भाविकांसाठी कुळाचारासाठी सुविधा इत्यादी बाबत मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. 

यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी उपसभापती यांचा महावस्त्रे व देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. बैठकीस धारशिवचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थान चे व्यवस्थापक अरविंद बोळंगे उपस्थित होते. वास्तुविशारद हेमंत पाटील आणि तेजस्विनी आफळे यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमाद्वारे उपस्थित राहून माहिती दिली.


निलम गोऱ्हे यांच्या सुचना

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी न्यायमुर्ती कोचर समितीच्या शिफारसीचा विकास आराखड्यात समावेश करावा. मंदिरात दिवे, मशाल घेवून जाणाऱ्या भाविकांसाठी वेगळा मार्ग असवा. मंदिर परिसरात कुलाचारासाठी कती जागा लागते हे तीन पुजारी मंडळाने एकत्र बसून कोणत्या जागेवर कुलाचार करायचा यावर निर्णय घ्यावा. तुळजाभवानी देवींच्या दागिण्याचे फोटो भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकाजवळील शासकीय गोदामाजवळ असलेल्या जागेवर भाविक सुविधा केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे आदी सुचना उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केल्या. 


 
Top