धाराशिव (प्रतिनिधी)- बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती विरोधात ॲट्रॉसिटी, मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावा. तपास अधिकारी राठोड यांची कठोर चौकशी करण्यात यावी. तसेच हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून संबंधित सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ऑल इंडिया दलित पँथर सेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे दि.22 एप्रिल रोजी केली आहे.

बीड येथील के. एस. के. महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारी साक्षी कांबळे हिच्यावर झालेला अन्याय आणि तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे बौद्ध समाजासह संपूर्ण समाजात प्रचंड संताप आहे. साक्षी ही एक होतकरू आणि कष्टाळू विद्यार्थीनी होती. तिचे लग्न 20 एप्रिल 2025 रोजी ठरले होते. परंतू महाविद्यालयातील गुंड प्रवृत्तीच्या नराधम आरोपीने तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. तिचे लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या अमानुष त्रासाला कंटाळून साक्षीने आपल्या मामा यांच्या घरी जाऊन फाशी घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यातून बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि शैक्षणिक संस्थांमधील असुरक्षित वातावरण उघडकीस येते. या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. साक्षी कांबळे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. यावर जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे अंसुर्डेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे, यशपाल गायकवाड, दयानंद सुरवसे, योगेश बनसोडे यांच्या सह्या आहेत.


 
Top