तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील खंडाळा, तिर्थ ब्रु, तिर्थ खुर्द, काक्रंबा या चार गावातील पवनचक्की कंपन्यांच्या रस्ते तयार करण्याच्या कामाच्या व पवनचक्कीचे फाऊंडेशन कामाच्या शासनास प्रदानकरण्यात येणाऱ्या रॉयल्टीमध्ये पवनचक्की कंपन्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. सदर कामात झालेल्या गैरप्रकारावर कडक कारवाई करावी व रिन्यु कंपनीच्या मनमानी कारभारास चाप लावावा. अशी मागणी तहसिलदार तुळजापूर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने  निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापूर तालुक्यातील मौजे खंडाळा, तिर्थ (बु.), तिर्थ (खु.), काक्रंबा या गावांमध्ये रिन्यु ग्रिन एनर्जी प्रा.ली. या कंपनीचे अनेक पवनचक्की विज निर्मितीचे मनोरे उभारणीचे काम झालेले आहे. सदर कामात मुख्य रस्त्यापासून पवनचक्की लोकेशन पर्यंत जाण्यासाठी एक मुख्य रस्ता व पवनचक्कीचे अवजड पंखे वहन करण्यासाठी तात्पुरता रस्ता व पवनचक्कीचा मनोरा उभारणी करताना घेण्यात येणारा खुप मोठा खड्डा इत्यादी कामे करताना सदर रिन्यु कंपनी ही शासनास अत्यंत कमी प्रमाणात रॉयल्टी भरुन शासनाचा कर बुडविन्याचे काम करत असल्याचा संशय येत आहे. अधीकची तोंडी चौकशी रिन्यु कंपनीकडे केली असता थातुरमातुर उत्तरे देऊन तालुक्यातील सुजाण नागरीकांची चेष्टा या रिन्यु कंपनीने चालवली आहे. दोन रोड व एक पवनचक्की लोकेशनचा खड्डा इत्यादी कामात नेमके किती ब्रास गौण खनिज उत्खनन होते ? याची योग्य माहीती देण्यास तयार नाही. त्यामुळे तहसीलदार यांनी रिन्यु कंपनी कडुन सदर रस्तेकाम व पवनचक्की लोकेशनसाठी घेण्यात येणारा खड्डा या कामाची एसओपी मागवुन घेण्याची मागणी करण्यात आली आहे.  त्या एसओपी प्रमाणे फक्त शासकीय पंच नेमुन सदर रस्ते काम व पवनचक्की लोकेशनसाठी खणलेला खड्डा इत्यादी कामात नेमके किती गौण खनिज उत्खनन केले याची तफावतीची तपासणी करावी. पंचनामा व स्थळ पाहाणी करुन सदर कामात झालेल्या गैरप्रकारावर कडक कारवाई करावी व रिन्यु कंपनीच्या मनमानी कारभारास चाप लावावा अशी मागणी केली आहे.


 
Top