भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील प्रसिद्ध समाजसेवक आबासाहेब मस्कर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, त्यांचा पक्षप्रवेश मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी आबासाहेब मस्कर यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “भूम शहरासाठी झटणारा एक खंबीर आंदोलक व समाजसेवक आता भाजपमध्ये आहे. त्यांच्या सहभागामुळे भूममधील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल.”

आबासाहेब मस्कर यांनी भूम शहरात अनेक सामाजिक आणि विकास कामांसाठी आंदोलन करून ठोस भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना पक्षात स्थान दिले. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. भ्रष्टाचारविरोधी लढ्यात आक्रमक भूमिका घेण्याच्या निर्धाराने त्यांनी पक्षप्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत, पक्षप्रवेश केल्याचेही यावेळी सांगितले. भूम शहरात भाजपची ताकद वाढण्यास मस्कर यांच्या सहभागामुळे निश्चितच मदत होणार आहे.


 
Top