धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने 1 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत “समता पंधरवडा“ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत 2025 -26 या शैक्षणिक वर्षासाठी 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रकरणांची संख्यात्मक माहिती तालुका व महाविद्यालय निहाय संकलित केली जाणार आहे. तसेच, सीईटी परीक्षा व डिप्लोमा तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजनही करण्यात येणार आहे.सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज समान संधी केंद्राच्या माध्यमातून गोळा करून त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार असून, लवकरात लवकर जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील व सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.