धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकारी संघटनेचे 47 वे राज्यव्यापी अधिवेशन 26 व 27 एप्रिल रोजी कोल्हापुरातील द फर्न हॉटेलमध्ये आयोजित केले असून, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या अधिवेशनास महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादिकर, महापारेषणचे प्रभारी संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे प्रादेशिक संचालक (पुणे) भुजंग खंदारे, प्रभारी कार्यकारी संचालक (मानव संसाधन) व प्रादेशिक संचालक (नागपूर) परेश भागवत, महानिर्मितीचे प्रभारी कार्यकारी संचालक (मानव संसाधन) नितीन वाघ, महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर हे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपन्यांतील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, सुरक्षा व अंमलबजावणी, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे नेतृत्त्व करणारी एकमेव बलाढ्य संघटना आहे. संघटनेच्या राज्यव्यापी वार्षिक 47 व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती, खासगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण, अतांत्रिक अधिकाऱ्यांची सरळसेवा भरती, पदोन्नती, मनुष्यबळ पुनर्रचना यावर विचार मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव विजय गुळदगड आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या कोल्हापूर कार्यकारिणीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, सचिव श्रीकांत सनगर, शशिकांत पाटील, शंकर सावंत, विनोद खोत, अविनाश कर्णिक, महेश साळुंखे, प्रकाश शिंदे, सारंगधर कळसकर, विश्वजित भोसले यासह कोल्हापूर परिमंडल कार्यकारिणीचे सर्व सभासद परिश्रम घेत आहेत.