धाराशिव (प्रतिनिधी)- शारदा विद्यानिकेतन हायस्कूल, सारोळा बुद्रुक (ता. जि. धाराशिव) येथे इयत्ता 10 वीच्या 1993-94 बॅचचा स्नेहमेळावा तब्बल 31 वर्षांनंतर अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. “न भूतो न भविष्यति“ ठरेल, असा हा अविस्मरणीय सोहळा रविवारी 27 एप्रिल रोजी पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून प्रशालेचे माजी मुख्याध्यापक भागवत रणदिवे उपस्थित होते. सर्वप्रथम बॅचच्या वतीने शाळेसाठी बांधण्यात आलेल्या कमानीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुरेशभाऊ देवगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास दहावीच्या बॅचचे सर्व माजी शिक्षक व गुरुजन एस.के. भोसले सर, एम.डी. जाधव सर, एम.बी. साठे सर, आर.के. कदम सर, तसेच सेवक दामाजी बोरकर व नारायण शितोळे यांचे स्वागत शाल, श्रीफळ व विठ्ठलमूर्ती देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संचालक व बॅचचे माजी विद्यार्थी जयंत बाकले यांनी केली. “लहान होऊया आणि शाळा शिकूया“ या भावनेने पुन्हा एकदा एकत्र आलेल्या मित्रांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रशांत रणदिवे, धनंजय कोल्हे, नामदेव खरे, बसवेश्वर देवगिरे, दिनकर देवगिरे आदी मित्रांनी अनुभव कथन करत उपस्थितांना भावविवश केले.
या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुलींची उपस्थिती, ज्या आजही विविध जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या. रूपाली पाटील, बानूबी मुजावर, रेखा मेटे, कालींदा वाघमारे, कमल चंदने, गंगाबाई जाधव, मुक्ता पवार, गंगुबाई रणदिवे आणि कल्पना हाजगुडे यांना समई भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात माजी सचिव सोपान दादा कोल्हे यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. शिक्षक गुरुजनांनी बॅचचे कौतुक करत शैक्षणिक प्रवास आणि बदलावर मार्गदर्शन केले. भागवत रणदिवे सरांनी शाळेचे नाव, ब्रीदवाक्य आणि नेतृत्वाबाबतचे विचार मांडून उपस्थित बॅचमित्रांवर कौतुकाची थाप दिली. सध्याचे मुख्याध्यापक मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या सागर घायतिडक आणि पार्थ जाधव यांचा सत्कार राजेंद्र कासार व दत्तात्रय जासूद यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग घोडके यांनी केले. या गेट-टुगेदरला माजी विद्यार्थी 47 पैकी 41 जण उपस्थित होते हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश ठरले.संस्थेचे संचालक रमेश आप्पा रणदिवे, सावन देवगिरे, नंदकुमार चंदने आणि सध्याचे शिक्षकवृंद डीकुळे सर, पडवळ सर, पिसे सर, बारटक्के सर, रायजादे सर, पाटील मॅडम, मगर मॅडम, चिलवाड मॅडम, दूधबे मामा यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बॅचचे मित्र-मैत्रिणींनी परिश्रम घेतले.