धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी परिपूर्ण अंतिम प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता व प्रशासकीय मान्यतेसाठी तो मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता.दिनांक 4 फेब्रुवारीच्या बैठकीत यात कांही बदल सुचवण्यात आले होते व त्याचे अनुपालन करून तो पुन्हा सादर करण्यात आला होता. दिनांक 17 मार्च रोजी झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली असून रु.1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. आता लवकरच या विकास आरखड्यास अंतिम मंजुरी मिळेल,असा विश्वास मित्रचे उपाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्तआमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा,श्री तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देतानाचा 108 फुटाचा पुतळा, घाटशिळ, महामार्गाजवळील सोलापूर बायपास पट्टयामध्ये व हडको येथे भक्तनिवास, प्रसादालय,पुस्तकालय, भोजनालय, भाविक सुविधा केंद्र,वाहनतळ तयार करणे.वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच विकासकामांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता देखील निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. भूसंपादन व शासकीय करापोटी आवश्यक असणारे शुल्क तसेच विकासकामांसाठी लागणारा निधीसाठीचा अंतिम प्रारूप आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता त्यास आता मान्यता मिळाली असून रु.1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे पाठवण्यात आला आहे व त्याला लवकरच अंतिम मान्यता मिळेल असा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तुळजाभवानी देवीचे क्षेत्र वैश्विक दर्जांचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी सर्वसमावेशक प्रक्रियेचा अंगीकार करण्यात आला आहे. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करुन योग्य आक्षेप व सूचनांचा आरखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे.शहरात व शहराकडे सोलापूर, बार्शी, धाराशिव,औसा व नळदुर्गकडून येणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यावरील प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक कमान बसवण्याच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरीजी यांची भेट घेण्याचे ठरले असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैकपटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात 30% तरतुद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, जमिनीचा चांगला मोबदला देण्यात येणार असून आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रयत्न आहे.