धाराशिव (प्रतिनिधी)- पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यातील हजारो धरणांमुळे सिंचनाच्या सुविधेसोबतच पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू झाल्या आहे.धाराशिव जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे पाणी,शेती व पर्यटनावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवून त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणे आवश्यक आहे.जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्वांचा पुढाकार गरजेचा आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केले.

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जागतिक जल दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.आज 22 मार्च रोजी नियोजन भवन सभागृहातील या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयसिंह थोरात,जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.राऊळ,जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सरवदे,बीजेएसच्या कांचनमाला सांगवे,स्वयंम प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती नसीम शेख,सुप्रभा प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष राजेंद्र कासार व जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांची उपस्थिती होती.

पुजार पुढे म्हणाले की,जिल्ह्यात पाण्याच्या बचतीसाठी कमी पाण्याचे पीक घेतले पाहिजे.कमी पाण्यात जास्त उत्पादन हा विचार करून पिकांची लागवड केली पाहिजे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वॉटर बजेटिंगचा विचार करून शेती केली पाहिजे.शासनाच्या अनेक योजना आहेत, या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना आहे.या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जास्तीत जास्त गाळ आपल्या शेतात टाकावा,त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारच नाही यासाठी त्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन जिल्हा या योजनेत राज्यात अग्रेसर राहील या दृष्टीने काम करावे.असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

डॉ.घोष म्हणाले की,तलावातील गाळ शेतात टाकल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होते.जमिनीची सुपीकता वाढते.कोणत्याही योजनेत लोकांचा सहभाग असल्याशिवाय ती योजना यशस्वी होत नाही.शाश्वत परिवर्तन करायचे असेल तर लोकसहभाग असणे आवश्यक आहे.पाण्याचा वापर योग्य प्रमाणात आणि काटकसरीने करणे आवश्यक आहे.पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे.पाणी स्वच्छ कसे राहील व त्याचा वापर कसा करता येईल या दृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

माने म्हणाले की,जिल्ह्यात सरासरी 603 मी.मी पाऊस पडतो.365 दिवसांमध्ये मोजकेच काही दिवस पाऊस पडतो. त्यामुळे पाणलोट क्षेत्रासाठी जिल्ह्यात काम करण्याची तसेच भूगर्भात जास्तीत जास्त पाणी मुरवण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्याची आवश्यकता आहे. जल चळवळीचे रूपांतर लोक चळवळीत झाले पाहिजे,असे ते म्हणाले.

थोरात म्हणाले,पाण्याची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे आहे. पृथ्वीवर 97 पाणी समुद्राचे तर 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे.पृथ्वीवरील 800 कोटी लोक 3 टक्के पाण्यांवर अवलंबून आहे.त्यामुळे पाण्याची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम पाणी व पर्यावरणावर होत आहे.नाला खोलीकरण आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेच्या निमित्ताने पाण्याची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे.पुढच्या पिढीची जाणीव ठेवून जलक्षेत्रात काम करण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.

प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या कळंब तालुक्यातील श्रीमती प्रिया राखुंडे आपल्या मनोगतातून बोलताना म्हणाल्या,जिल्हा दुष्काळी आहे.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे,पण जिल्ह्यात साखर कारखाने जास्त आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपल्याला पाणी भूगर्भात पाणी मुरवावे लागेल.पारंपारिक पिकांना प्राधान्य देताना कमी पाण्याची पिके आपल्याला घ्यावी लागतील तसेच मिश्र पिकांचा समावेश करावा लागेल.उसासाठी देखील ठिबक सिंचनाचा वापर करावा लागेल.पीक पद्धतीत बदल केले तर पाणी व्यवस्थापनात बदल करता येईल. जलसंधारणाच्या कामात महिलांचा सहभाग घेणे आवश्यक आहे,कारण महिला ज्या क्षेत्रात काम करतात त्यामध्ये यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती सांगवे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या विषयावर बोलताना म्हणाल्या की, आज शेतकरी रासायनिक शेतीकडे वळला आहे.त्यामुळे कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.मुलाच्या भविष्याचा विचार करून पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे.महिलांनी पाण्याच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे यावे.तलावातील गाळ काढून शेतात टाकावा.त्यामुळे शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या पुढाकारातून जलसुरक्षित मराठवाडा या विषयावर बोलताना नसीम शेख म्हणाला की,शेत व गावाला पाणीदार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.शेत पीक पद्धतीत बदल झाले पाहिजे. रसायनमुक्त शेतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.महिलांनी शेती व पाणी या क्षेत्रात काम करावे. जलक्षेत्रातील कामासाठी लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे,असे त्या म्हणाल्या.यावेळी कासार यांनीही मार्गदर्शन केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जल पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.तसेच शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top