धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी आज घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिकेत सदर महाविद्यालय हे  शासकीय म्हणून ओळखले जाणार आहे.यानिर्णयामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षण मिळणार  असून आपल्या मागणीला प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी आज बैठकी घेतली व त्यात हा  निर्णय झाला असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांची शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सोय होऊन या भागाचा शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे यासाठी आपला आग्रह होता व त्या अनुषंगाने आपण याबाबत मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, उदय सामंत व विद्यमान मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो.त्याला आज यश मिळाले असून या निर्णयामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये मोठी बचत होणार आहे.तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्याकरिता मदत होईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे



मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय.

यासाठी आपण धाराशिवचा आमदार असल्यापासून पाठपुरावा करत होतो.त्याला आता यश आले असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे आभारी आहोत.या निर्णयामुळे या भागातील विद्यार्थ्यांना आता ७००००/- ऐवजी २५ ते ३००००/- शुल्क लागणार आहे.मराठवाड्यातील विद्यार्थ्यासाठी ७०% जागा आरक्षित राहणार असल्याने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे तसेच महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगप्रमाणे वेतन मिळणार असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.

 
Top