धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी धाराशिव येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे, तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव आणि पुरवठा निरीक्षक श्री.अमोल बाहेकर उपस्थित होते.पाहणी दरम्यान,गोदामातील दप्तर व धान्याची तपासणी करण्यात आली.थप्पीनिहाय धान्य मोजणी करून त्याची गुणवत्ता तपासण्यात आली.तसेच गोदामपाल यांना स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव येथील स्वस्त धान्य दुकान क्र.01 यांची पाहणी केली. ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धान्याच्या वितरणाची तसेच ई-केवायसी प्रक्रियेची तपासणी करण्यात आली. 31 मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे 100 ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी धान्याच्या नमुन्यांची तपासणी तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी शिवभोजन केंद्र येथे भेट देऊन अन्नाच्या गुणवत्तेची आणि वितरण प्रक्रियेची पाहणी केली.गरजू व गरीब लाभार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त दरात भोजन मिळते का,याची खातरजमा केली.तसेच शिवभोजन केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या.

 
Top