धाराशिव (प्रतिनिधी)-  मूलभूत कौशल्य आयुष्यात खूप महत्त्वाचे असून तुम्ही फक्त डिग्री घेऊन चालत नाही. तर त्यासाठी मूलभूत कौशल्यांना आत्मसात करावे लागते. तेव्हाच तुमच्यामधील गुणवत्ता सिद्ध होते. असे प्रतिपादन  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी केले.

शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित  बेरोजगार/ नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि तेरणा युथ फाऊंडेशन तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, तेरणा ट्रस्टचे विश्वस्त सतीश दंडनाईक ,कौशल्य विकास विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या उपायुक्त  विद्या शितोळे, उद्योजक संजय देशमाने, तेरणा ट्रस्टचे समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी सतीश दंडनाईक, बनकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी प्रास्ताविक केले. या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील 22 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई, सोलापूर, बार्शी, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील कंपन्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी हायटेक शेती करावी म्हणून तेरणा ड्रोन कृषी प्रशिक्षण केंद्रच्या वतीने ड्रोन कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचे मार्गदर्शनबाबत ही स्टॉल लावला होता. या सर्वांची माहिती सहभागी उमेदवारांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले. तर हा मेळावा यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा अशोक जगताप,डॉ गुरुप्रसाद चिवटे, प्रा. आर. डी.गुरव, प्रा.अनिरुद्ध देशपांडे, प्रा. आर. ए. दंडनाईक, प्रा. आर. एस.सरवदे, प्रा. किसन डोलारे, आर.एल.मुंढे यांनी सहकार्य केले.

 
Top