उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी,(दि08) वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे होत्या. यावेळी भारत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल लताताई शिवाजीराव मोरे व मुलाच्या ब्रेनडेड मृत्यूनंतर अवयव दान करून इतर सहा जणांना जीवनदान देणाऱ्या सुमन बाळू वरवटे, यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माजी नगरसेविका संगीता कडगंचे, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सरिता उपासे, शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड, सोनाली मुसळे, पूजा गुंडीले, वर्षाराणी पाटील, सखुबाई चव्हाण या आधुनिक कर्तुत्ववान महिलांचा तसेच सुमन साठे, कविता केदारे, परिचारिका सुनिता राठोड, वनमाला वाले यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर यावर्षीच्या इन्स्पायर अवॉर्ड विजेत्या वैष्णवी केदारे, कुलसूम उस्ताद व आदित्य सगर या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक ताजुद्दीन सरवडे व ममता गायकवाड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले. विद्यानंद सुत्रावे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पालक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.