धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी सांगितले.
19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बडे, व्यवस्थापक एम.डी.सूर्यवंशी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी खाडे,महावितरणचे अधीक्षक अभियंता आडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण काळे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की,जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील.विशेषतः वडगाव सिद्धेश्वर,उमरगा, वाशी, सरमकुंडी, तामलवाडी, डिकसळ आणि कळंब या औद्योगिक क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा, वीजपुरवठा, पोलीस चौकी आणि प्रदूषण नियंत्रण यासारख्या सुविधांवर भर दिला जाईल.तसेच फटाके उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तसेच लेदर क्लस्टर आणि सोलर प्रकल्प उभारण्याची मागणी समितीपुढे ठेवण्यात आली.औद्योगिक विकासामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील,असेही पुजार यांनी सांगितले. तसेच,उद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.