धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा झाल्यास दरडोई उत्पन्नात मोठी वाढ होणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी कृषी, उद्योग व पर्यटनाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यात 35 हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केले आहे. कुशल मनुष्यबळ त्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच पुणे येथील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सहकार्याने तुळजापुरात कौशल्य विकास विद्यापीठ उभारण्यात येत आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने त्याअनुषंगाने सहकार्य करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. त्यास 'टीसचे' प्र-कुलगुरू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने ग्रामोदय अंतर्गत 'ग्रामीण विकासाच्या भविष्याची पुनर्कल्पना, समकालीन आव्हाने आणि नवीन मार्ग' या विषयावर ग्रामीण विकासासंदर्भात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाच्या उद्घाटन करत सर्वांशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.  पुणे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ आपल्याला जिल्ह्यातील भौगोलिक आणि नैसर्गिक बाबींचा अभ्यास करून अभ्यासक्रम तयार करावयासाठी सहकार्य करत आहे. त्यादृष्टीने तुळजाभवानी मंदिर समितीसोबत सिम्बायोसिस विद्यापीठाचा सामंजस्य करारही झाला आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना हक्काचे रोजगार उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण अर्थकारण आणि सुधारणा याबाबत अधिक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मंदिर समितीला सहकार्य करावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, तहसीलदार अरविंद बोळंगे,  टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्र-कुलगुरू प्रो.शंकर दास, संचालक प्रो. बाळ राक्षे, डॉ. गजानन डांगे, प्रो. अरविंद तिवारी, प्रो. मधूश्री शेखर, रजिस्ट्रार नरेंद्र मिश्रा, प्रो. राजकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

 
Top