भूम (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवार 22 मार्च 2025 रोजी भूम न्यायालयात आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन भूम विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. पंडीतराव ढगे यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयात मोटार वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 320 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची (चेक बाउन्स) प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखल पूर्व प्रकरणे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आलेली आहेत.

आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवण्याकरिता नागरिकांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. लोकन्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरिता पक्षकार त्यांच्या वकिलांची देखील मदत घेऊ शकतात. लोक न्यायालयामध्ये प्रकरण मिटल्यास न्यायालयीन शुल्क नियमाप्रमाणे परत मिळू शकते. प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोक न्यायालयाच्या निकालावर अपील करता येत नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटूता कमी होण्यास मदत होऊन वेळ व पैसा दोघांचीही बचत होते, अशी माहिती भूम विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. पंडीतराव ढगे यांनी दिली आहे.

 
Top