मुरूम (प्रतिनिधी) : उमरगा येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव पंधरवडा तसेच जागतिक महिला दिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात बुधवारी (ता.12) रोजी निमंत्रित कवयित्रींचे विशेष कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्या तथा विरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुरेखाताई मलंग होत्या. या वेळी बोलताना सरिता उपासे म्हणाल्या की, कथा लेखन करताना आपला विषय मांडताना शब्दांची मर्यादा नसते. आपण कथा लहान मोठी ठरवून लिहीता येते पण कविता कमी शब्दात मांडायची तर त्यासाठी अभ्यास, सराव यांची गरज असते असे सांगत त्यांनी त्यांच्या दोन वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या आणि उत्तम दर्जाची कविता कशी निर्माण होते यावरमार्गदर्शन केले. विचार मंचावर शिला मुदगडे, केंद्र प्रमुख, गटशिक्षण कार्यालय, उमरगा डॉ. शशि कानडे स्त्रीरोग तज्ज्ञ भाग्यश्री गुंड-पवार सदस्या, विधिज्ञ समिती उमरगा आदींची प्रमुख उपस्थिती होती. आरंभी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
निमंत्रित कवयित्रींच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा सरिता उपासे या होत्या. या कवी संमेलनात निमंत्रित कवयित्रींच्या कविता नी रंगत आणली.
कविसंमेलनाची सुरुवात डॉ. शुभांगिनी महाजन यांच्या कवितेने झाली. रेखा सुर्यवंशी यांनी वीर रसाची कवित म्हणून गेल्या की... दुष्टांना संहारण्याची
आम्हाला परवानगी हवी
जिजाऊंची लेक बनून
वसवू दुनिया नवी. तर तूझ्या हाती गोंजारत मज पदराखाली अमृत पिता, उमलण्या आधी कळीचा घोट का ग घेता ? असा सवाल करत सुमन पवार (नाई चाकूरकर) च्या कवयित्रीने स्त्रीभ्रूणहत्याच्या प्रश्नाला हात घातला. स्री जीवना संबंधीचा धागा पकडून कवयित्री ॲड. फरहिन खान-पटेल म्हणतात... संतती आहे तुझ्या ही पोटी ....गर्व करु नको आयुष्या मधी.. पृथ्वीचे चक्र आठवणीत ठेव...फिरणार कधी ना कधी.
स्री पुरुष जगण्याची तऱ्हा मांडताना कवयित्री शशीकला राठोड म्हणते पुरुष गेला की घर उजाड होते... स्री गेली की गुढग्याला बाशिंग तयार असते.
माता माझी माय माझी या कवितेतून आर्त विनवणी करीत प्रा. कान्होपात्रा शिंदे म्हणतात....जन्म मला घेऊ दे
सुंदर सुंदर जीवन हे
सु नयनांनी पाहू दे
कळी माझी उमलू दे.तर कोण आहे कोणाचे ...जसे नदीचे किनारे...माझे सांगून मन झाले वेडे.. कोण पहात नाही कोणाकडे ही वेदना संवेदनेतून प्रा.अनुराधा इंगळे यांनी मांडली. मालती बारस्कर यांनी बांधावरचं झाड या कवितेतून बागेतील फुलझाडे आणि बांधावरचं झाड यांची तुलना करून कविता सादर केली.
त्या म्हणतात, इतक्यात पाहिले मी... उन्हातून येताना कष्टकरी...नजर त्याची विसाव्या साठी सावलीचा शोध करी... जाऊन बसतो तो झाडाखाली सावलीत..
मी आणि चिमणा दिवसभर काम करु
अतिरिक्त काम अन् जोडधंदा ही करु
जमेल तसे हप्ते फेडू.....असा संसार पट मांडणारी कविता सादर केली.
प्रा. कान्होपात्रा शिंदे यांनी..
ॲड. शुभदा पोतदार यांनी..
प्रा. सरोज सगर यांनी..
शिला मुदगडे यांनी सखी ही कविता सादर केली.सखी बंधनाचे हे धागे करुनी सैल
स्वच्छंदी मनी जगून घे आता तरी
ही मुक्त स्वातंत्र्याच आस अधोरेखित केली आहे.
प्रियंका गायकवाड, प्रा. सरोज सगर, आदी कवयित्रीनी स्री सुलभ भावना व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. कार्यक्रमात सर्व उपस्थित कवयित्री, मराठी भाषा विषय शिक्षिका निर्मला चिकुंद्रे, उषा सगर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अवंती सगर यांनी केले तर सुत्र संचालन मसाप सदस्या उषा सगर आणि वंदना सगर यांनी केले.आभार प्रदर्शनाची जवाबदारी ज्योती समदुर्ले-सगर यांनी पार पाडली. कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषद सदस्या मधुरा निंबाळ, रुपा कांबळे, कमल शिंदे, सविता सगर, सुवर्णा चौधरी, सुनिता बारस्कर, सिमा सगर, अनुसया पसरकल्ले आदीसह रसिक उपस्थित होते.