ताज्या घडामोडी



धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज 3 मार्च रोजी जिल्हास्तरीय बैठक पार पडली.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी,तसेच स्वयंसहाय्यता समूहातील निवडक महिला उपस्थित होत्या.जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत महिलांनी तयार केलेली उत्पादने भेट देऊन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक,वारसा, निसर्ग व साहसी पर्यटनाच्या विकासात महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.यात्रा बस,होमस्टे, ट्रेकिंग मार्ग,खानावळी आणि हॉटेल व्यवसायाच्या संधी ओळखून त्याद्वारे उपजीविका निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा,असेही त्यांनी सांगितले. स्वयंसहाय्यता समूहांमार्फत उत्पादित वस्तूंना स्थायी बाजारपेठ मिळावी,यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील,असे सांगून श्री.पुजार म्हणाले दर तीन महिन्याला स्थानिक पातळीवर उत्पादनांचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात यावे. महिलांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून उद्योगांचे क्लस्टर तयार करावेत,जेणेकरून व्यवसाय वृद्धीला गती मिळेल, असे पुजार म्हणाले.

या बैठकीला जिल्हा अभियान व्यवस्थापक बलवीर मुंडे,जिल्हा व्यवस्थापक (विपणन) समाधान जोगदंड,जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) आकाश बोब्बे, लेखाधिकारी संजय पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक तसेच मोठ्या संख्येने स्वयंसहाय्यता समूहातील महिला उपस्थित होत्या.या उपक्रमांमुळे धाराशिव जिल्ह्यातील महिलांना नवीन आर्थिक संधी मिळणार असून,त्यांच्या सशक्तीकरणाला गती मिळेल. 


 
Top