धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या 400 हून अधिक पत्रकारांचा अपघाती आणि जीवन विमा काढण्यात येणार आहे. सर्व पत्रकारांनी यासाठी आपली माहिती 15 मार्चपर्यंत पाठवावी. असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे यांनी केले आहे.
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. तसेच गरजेनुसार औषधोपचार करण्यात येतात. ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने यापूर्वी अपघाती विमा काढण्यात आला होता. यावर्षीही आमदार कैलास पाटील यांच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती 10 लाख रूपयांचा अपघाती विमा काढण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पत्रकारांना अपघातावरील उपचारासाठी 1 लाख रुपये मिळतील. तर अपघातात कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास 10 लाख आणि त्यांच्या 2 अपत्याच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये मिळू शकतात. अशी माहिती पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे जिल्ह्यात जवळपास 400 सदस्य असून, या सर्व सदस्यांचा संपूर्ण विमा काढण्यात येणार आहे. पत्रकारांनी सविस्तर माहिती तसेच आधार कार्ड 15 मार्चपर्यंत जिल्हा पत्रकार संघाकडे पाठवावे. असे आवाहन धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.