धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कुक्कुट पक्षांचे पाठविलेले नमुने होकारार्थी आल्याने बर्ड फ्लूची पुष्टी झाली असून सतर्कता बाळगून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. 21 फेब्रुवारी रोजी ढोकी येथे एका कावळ्याच्या असामान्य मृत्यूची नोंद झाली होती.त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथे पाठवण्यात आले होते. 4 मार्च 2025 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य संसर्गाचा धोका लक्षात घेता ढोकी गाव आणि 10 किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी खालील उपाययोजना आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत.बाधित क्षेत्रातील वाहनांची ये-जा मनाई करण्यात आली असून,खाजगी वाहने परिसराबाहेरच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बाधित भागातून जिवंत किंवा मृत पक्षी,अंडी, खाद्यपदार्थ,पोल्ट्री खत आणि इतर साहित्य बाहेर नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करण्याचे आदेश

बाधित पोल्ट्री फार्ममध्ये संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.स्थानीय नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध, तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांची वाहतूक बंद.प्रभावित पोल्ट्री धारकांनी त्यांच्या सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,ढोकी गाव आणि 1 किमी त्रिज्येतील सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या नेतृत्वाखालील जलद प्रतिसाद पथक शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेत आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस विभाग,आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि परिवहन विभाग यांनी समन्वय साधून काम करावे. अशी सूचना देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

 
Top