परंडा (प्रतिनिधी)- राज्य प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 12 मार्च 2025 रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून 88 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला सिरसाव येथील सातवीच्या विद्यार्थिनी वैष्णवी प्रशांत नवले व मानसी अविनाश गावकरे या विद्यार्थिनींचा या स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. या स्पर्धेत त्यांच्या प्रकल्पाचा विषय होता 'भरडधान्य' यासाठी त्यांना त्यांच्या विज्ञान शिक्षिका दिपाली सबसगी यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी कसे राहील यासाठी या शिक्षिका नेहमी प्रयत्नशील असतात. परिसरातील विद्यार्थ्यांनी जंक फूड्स टाळून आरोग्यदायी पौष्टिक पदार्थ खावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मॅडम व विद्यार्थिनींनी हा प्रोजेक्ट तयार केला. यामध्ये भरड धान्याच्या विविध रेसिपीचे बुकलेट या विद्यार्थिनींनी बनवले आहे. तसेच पौष्टिक व चविष्ट असा मिलेटबार, नाचणी वडी, मिक्स धान्याची चकली वगैरे असे भरपूर पदार्थ व त्यांचे सादरीकरण त्यांनी राज्याच्या स्पर्धेत केले.
डॉ.राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र, महेश पालकर संचालक योजना विभाग, कृष्णकुमार पाटील संचालक बालभारती पुणे, हिरालाल सोनवणे संचालक क्रीडा विभाग पुणे, डॉ. कमलादेवी आवटे उपसंचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल डाएट धाराशिवचे प्राचार्य डॉ.जटनुरे, सर्व अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी खुळे, शाळेचे मुख्याध्यापक खटाळ तसेच शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.