धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आरोग्य क्षेत्रात सतत कार्यरत असलेल्या तुलसी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रभाकर त्यांच्या गंगामाई हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हाडांच्या आणि मेंदूच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत शिबिराचे आयोजन धाराशिव येथील बालाजी मंदिर येथे रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने संपूर्ण तपासण्या केल्या. हाडांचे तज्ञ डॉ. रुपेश कदम व न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट डॉ. निखिल तडवळकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये नागरिकांना तपासणी व उपचारांसह आवश्यक ती वैद्यकीय माहिती दिली.
या शिबिराचे उद्घाटन तुलसी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सोलापूर येथील सुप्रसिद्ध गंगामाई हॉस्पिटलच्या वतीने यामध्ये डॉक्टर निखिल तडवळकर (न्यूरो सर्जन) व डॉक्टर रुपेश कदम ( एमएस आर्थो ) हे मणक्याचे आजार, कंबर दुखी , हात व पायांना मुंग्या येणे, सतत डोके दुखणे, चक्कर येणे, मान दुखी, आदीसह संधिवात, मनगट व टाचदुखी , गुडघेदुखी हाडांची ठिसूळता आदि विविध आजारांवर मोफत तपासणी करून उपचार केले. यावेळी डॉ. अंजली काळे, संदीप अंधारे, देवा नायकल, मेसा जानराव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.