धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदु नववर्ष अर्थात गुढी पाडव्यानिमित्त नाणीजधाम दक्षिणपीठाचे अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखालील जिल्हा स्व-संप्रदाय समितीच्या वतीने धाराशिव येथे रविवार, 30 मार्च रोजी भव्यदिव्य हिंदु नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. स्वागतयात्रेमुळे अवघे शहर भगवेमय झाले होते.
गुढी पाडव्यापासून हिंदु नववर्षाची सुरुवात होते. यानिमित्त संप्रदाय प्रमुख अनिरुद्ध कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील समर्थनगर येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयापासून ही स्वागतयात्रा काढण्यात आली. प्रारंभी भव्य रथामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील व बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भव्यदिव्य स्वागत यात्रेला प्रारंभ झाला.
यात्रेत हातामध्ये भगवे ध्वज, माथ्यावर मंगलकलश व जनजागृतीचे फलक घेऊन महिला, तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सत्पुरुषांनी जो शिकविला तो मानवधर्म आपला.. पुढच्या पिढीला काय उपहार? देऊया त्यांना वैदिक संस्कार.. विश्वबंधुत्व भाव जोपासा, तोच कल्याणाचा मार्ग माणसाचा.. नववर्षाचा एकच निर्धार, जतन करु हिंदु संस्कार.. असे फलक लक्ष वेधून घेत होते. तर प्रभु श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, श्रीकृष्ण, संत गजानन महाराज, संत गोरोबा काका यांची वेशभूषा परिधान करुन आबालवृद्ध सहभागी झाले होते.
महाजन महाविद्यालयापासून निघालेली ही स्वागत यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महावितरण कार्यालय, जिजामाता उद्यान, देशपांडे स्टॅन्ड, नेहरु चौक, माऊली चौक, निंबाळकर गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, संत गाडगे महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे परत महाजन महाविद्यालय येथे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत स्वागतयात्रेची सांगता झाली.
यात्रेत स्व-संप्रदाय समितीच्या धाराशिव शहर, तालुका, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम वाशी तालुक्यातील सेवेकर्यांनी सहभाग घेतला. स्वागत यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्व-संप्रदाय समितीचे प्रमुख अनिरुद्ध कावळे, जिल्हा निरीक्षक साहेबराव आहेर, जिल्हाध्यक्ष संतोष केसकर, सचिव बाळासाहेब कानडे, महिलाध्यक्ष लक्ष्मी माने, युवाध्यक्ष आकाश जाधव, प्रवचनकार दिनेश देटे, विजय भारती यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या अनुयायांनी परिश्रम घेतले.