धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास रु.250 कोटी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दि. 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी 250 कोटी पेक्षा जास्तीची रक्कम आठवडा भरात 5 लाखाहून अधिक शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 719167 शेतकऱ्यांनी 579816.21 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 549791 शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसुचना दिल्या होत्या, त्यापैकी 532826 पुर्वसुचना पात्र झालेल्या आहेत. 532826 पात्र पुर्व सुचनापैकी 470072 पुर्वसुचना या सोयाबीन पिकाच्या आहेत. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित 6000 ते 6500 रूपये विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे. काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पात्र 60782 तक्रारीनुसार शेतकऱ्यांना 7000 ते 11000 रूपये पर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे.
महिनाखेर पर्यन्त ही रक्कम विमा कंपनीकडे उपलब्ध होवून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता सरकार कडून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ही रक्कम विमा कंपनीस प्राप्त होईल व विमा कंपनीच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात होईल.
शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा विरोधकांकडून केविलवाणा प्रयत्न
खरीप 2024 पीक विम्या पोटी विमा कंपनी कडे रु. 596 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला व त्या बदल्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 250 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असून उर्वरित 346 कोटी रुपये विमा कंपनीचा फायदा झाल्याचा कांगावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र यात त्यांची चूक नसून त्यांचे अज्ञान आहे. वस्तुतः मागील दोन वर्षांपासून राज्यात 100-80-110 हे सूत्र वापरले जात असून, कोणत्याही विमा कंपनीला फायद्याची रक्कम पुर्ण हप्त्याच्या वीस टक्क्यांपेक्षा अधिक दिली जात नाही. विरोधकांनी केवळ ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना का विमा मिळाला नाही, याचा शोध घ्यावा.