भूम (प्रतिनिधी)- बिहार येथे होणाऱ्या ३४ व्या किशोर- किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात भूम येथील कु. विश्वजीत अमर सुपेकर याची निवड झाली आहे. स्वराज क्रीडा मंडळाच्या या खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र संघात स्थान मिळवले असून, त्याच्या या यशाने संपूर्ण भूम तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विश्वजीत हा गेल्या काही वर्षांपासून कबड्डी खेळात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्याने जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या उत्तम खेळामुळे त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

३४ वी किशोर - किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा बिहार येथे होणार आहे, आणि महाराष्ट्र संघाकडून विश्वजीत आपल्या कौशल्याने चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्याच्या निवडीबद्दल स्वराज क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक, तालुक्यातील क्रीडा प्रेमी, शिक्षक, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशाने भूम तालुक्यातील इतर युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

महाराष्ट्र संघाकडून विश्वजीत सुपेकर कसा खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही त्याला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो!

 
Top