धाराशिव (प्रतिनिधी)- खडकाळ जमिनीवर शेती करणे कठीण असतानाही धाराशिव तालुक्यातील कौडगाव शिवारात विधिज्ञ जयंत शिवाजीराव जगदाळे आणि त्यांच्या पत्नी रेखा जयंत जगदाळे यांनी डोंगराळ भागात फळबाग फुलवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आंबा,नारळ,चिकू,चिंच,जांभूळ आणि कागदी लिंबू यांची लागवड करून ओसाड माळरानाचे समृद्ध मळ्यात रूपांतर केले आहे.विशेष म्हणजे ही सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जात असल्यामुळे त्यांची शेती नफ्यात आली आहे.
जगदाळे कुटुंबाकडे 30 एकर वडिलोपार्जित शेती असून ती खडकाळ आणि कोरडवाहू आहे.यापूर्वी तूर,बाजरी, सोयाबीन,मूग व उडीद यांसारखी पारंपरिक पिके घेतली जात होती.मात्र उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे शेती तोट्यात जात होती.कोकणातील फळबाग शेती पाहून प्रेरित झालेल्या जयंत जगदाळे यांनी आपल्या शेतीत ठिबक सिंचनाचा वापर करून दहा एकर क्षेत्रावर फळबाग लागवड केली.सुरुवातीच्या टप्प्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणी आल्या.मात्र, सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून, घागरीने झाडांना पाणी देत त्यांनी झाडे जगवली.या प्रयत्नांना यश मिळत गेल्याने गेल्या तीन वर्षांपासून फळांचा भरघोस उत्पादन मिळू लागले आहे.
त्यांच्या सेंद्रिय फळांना चांगली मागणी असून ग्राहक शेतात येऊन खरेदी करतात.तसेच ऑनलाइन मागणीसह घरपोच वितरणाची सुविधाही त्यांनी सुरू केली आहे.केशर आंब्याची चव विशेष गोडसर असल्याने त्याला चांगला दर मिळतो आहे.
त्याचबरोबर, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारून जगदाळे दाम्पत्य सेंद्रिय पद्धतीने कारले,शिमला मिरची, दोडका,टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला अधिक पोषक आणि रुचकर असल्याने सर्व शेतकऱ्यांनी हीच शेतीपद्धती अवलंबावी, असे आवाहन रेखा जगदाळे यांनी केले.
हुरडा महोत्सव
आज अन्न व पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत हुरडा महोत्सवाचे आयोजन विधीज्ञ जयंत जगदाळे यांच्या कौंडगाव येथील अर्जुन फार्म हाऊसवर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.या महोत्सवाच्या निमित्ताने अनेकांनी हुरड्याचा आस्वाद घेतला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,कृषी विभागासह अन्य विभागाचे अधिकारी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी या महोत्सवात सहभागी होऊन हुरड्याचा आस्वाद घेतला.