तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील रसांगलीतील साहित्यिक सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे यांच्या "आईची वही" या लोकसाहित्याच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. हे प्रकाशन प्रतिभा जगदाळे यांच्या मातोश्री, "आईची वही" या पुस्तकाच्या सहलेखिका आणि प्रतिभा जगदाळे यांचे वडील व तेर ता.धाराशिव येथील महाराष्ट्र संत विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आत्माराम लोमटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित होते. "आचार्य अत्रे यांच्या हाती बहिणाबाईंच्या कविता लागल्या आणि त्यांना महाराष्ट्रातल्या मातीतलं अस्सल सोनं गवसलं, तद्वतच प्रतिभा जगदाळे यांच्या हाती, आपल्या आईची, पन्नास वर्षांपूर्वीची वही लागली आणि त्यांना लोकधनाचा साठा गवसला. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या, गोळा केलेल्या लोकगीतांचा तो अभूतपूर्व असा ऐवज आहे." असे मत लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी, आपल्या अभ्यासपूर्ण आणि दीर्घ अशा प्रस्तावनेत मांडलेले आहे. लोकपरंपरेतील स्त्री चौकटीत बंदिस्त होती आणि अखंड कष्ट करीत होती. त्यावेळी आपल्या सुखाचे मार्ग तिने स्वतःच शोधले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती अखंड कष्ट करीत राही. त्यावेळी ती ओव्या, गाणी गात असे किंवा प्रार्थना म्हणत असे. ती काही कृती करी त्यावेळी ती काहीतरी गुणगुणत असे. ते या वहीत आले आहे. त्याचबरोबर मुलीच्या जन्मापासून ते तिच्या अंतापर्यंतचा प्रवास, म्हणजे मधला संपूर्ण दीर्घ अवकाश, म्हणजेच तिचे सुख, दुःख, सण, उत्सव, लग्न, लोकपरंपरेतील रीतिरिवाज, खेळ, वगैरे, यावेळी प्रसंगानुरूप तिच्या अंतर्मनाची जी अभिव्यक्ती होती ती गाण्यातून व्यक्त होत होती. ती या वहीत आहे. प्रतिभा जगदाळे यांच्या मातोश्री वत्सला लोमटे यांनी लिहिलेल्या आणि संकलित केलेल्या गाण्यातून पाऊणशे वर्षापूर्वीचा लोकवाङमयाचा ठेवा आईच्या वहीच्या निमित्ताने उजागर झाला आहे. त्यातून बदलत्या काळाच्या वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अवकाशाची दखल हे लोकवाङमयात घेत असते. वत्सला लोमटे यांच्या बदलत्या जाणीवांचा हा प्रवास आहे. प्रतिभा जगदाळे यांनी आपल्या आईची गाणी वाचकांसमोर ठेवताना त्यावर आटोपशीर असं परंतु महत्त्वाचं विवेचन केलेलं आहे. त्यामुळे त्या गाण्याचं एकूण सामाजिक सांस्कृतिक मोल लक्षात येतं. आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला लोकधनाचा साठा या वहीच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार सतीश भावसार यांनी रेखाटले आहे. प्रतिभा जगदाळे यांनी लोकसाहित्याचे हे पुस्तक, आपल्या मातृतुल्य गुरु, लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना अर्पण केले आहे.