तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील खोताचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील विद्यार्थी सार्थक सतीश शिंदे वय 8 वर्ष याचा शेतातील घराशेजारील शेततळ्यात बुडून बुधवार दि. 19 मार्च रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऐन रंगपंचमी दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरडेवाडी खोताचीवाडी येथील गट नंबर 44 मध्ये त्याचे घर असून घराशेजारील गेल्याच आठवड्यात तयार करण्यात आलेल्या शेततळ्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व प्रचंड दुःख व्यक्त केले जात आहे. पाण्याची पातळी खालावल्याने जनावरांच्या पिण्याची व चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी 45 बाय 45 चे हे शेततळे तयार करण्यात आले आहे. अवघ्या आठवड्यात ही दुर्दैवी घटना घडल्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे सार्थक हा शाळेत प्रचंड हुशार व गुणी विद्यार्थी होता त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ, आज्जी आजोबा असा परिवार आहे. त्याच्यावर बुधवार 19 मार्च रोजी रात्री दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या कुटुंबातील सदस्य यांचा ह्रदयद्रावक हंबरडा पाहून अंत्यसंस्कारासाठी उपस्थितानाही आपले अश्रू अनावर झाले होते. त्याच्या या आकस्मित निधनाने मंगरुळ व परीसरातून प्रचंड हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे.