धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आरोग्य विभागातील पॅरामेडिकल वर्करकडून पगार व टी.ए. बिल मंजुरीसाठी 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (25 मार्च) सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार आरोग्य विभागात लोहारा येथे कार्यरत असून, त्यांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा पगार आणि 2023-24 मधील प्रवास भत्ता प्रलंबित होता. पगार व भत्त्याच्या मंजुरीसाठी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50) यांनी 25,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब धाराशीव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी करून तक्रार खरी असल्याचे निष्पन्न केले. आज झालेल्या सापळा कारवाईत नरसिंग सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडून 15,000 रुपये स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत 15,000 रुपये रोख, 5 ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, 300 रुपये अतिरिक्त रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या निवासस्थानीही झडती सुरू असून, आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धाराशीव लाचलुचपत विभागाच्या या यशस्वी कारवाईने पुन्हा एकदा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.