धाराशिव (प्रतिनिधी) -  महाराष्ट्राच्या लोककलेचा मानदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीचा जागर आणि पंढरीच्या पांडूरंगाची दिंडी यंदाच्या विश्व साहित्य संमेलनात प्रमुख आकर्षण ठरले. धारशिवच्या 25 कलाकारांच्या पथकाने पुणे येथे पार पडलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ट सादरीकरण केले. या जागर आणि दिंडीने संमेलनातील सारस्वतांसह साहित्यप्रेमींची वाहवा मिळविली.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या मुख्य मंचावर आराधी लोकनृत्य आणि दिंडी लोकनृत्य सादर करण्यात आले. धाराशिव शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दरवर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील लोक महोत्सवात महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा प्रभावी अविष्कार विविध लोकनृत्याच्या माध्यमातून सादर करतात. यंदा नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सुवर्णपदक जिंकत या पथकाने दिंडी लोकनृत्याच्या माध्यमातून सबंध देशभरात महाराष्ट्राच्या लोक परंपरेचा बाज प्रभावीपणे सादर केला होता. लय, ताल आणि लोकसंगतेचा बाज असलेल्या या पथकाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्व मराठी साहित्य संमेलनात आपले सादरीकरण करण्याची संधी मिळाली. 14 मिनिटांचे आराधी नृत्य आणि 14 मिनिटांचे दिंडी नृत्य, अशा 28 मिनिटांच्या सादरीकरणासाठी 25 कलाकारांनी मोठी मेहनत घेतली. यात आठ मुली आणि 17 युवकांचा सहभाग होता.


या कलाकारांचा होता सहभाग

सुजित माने, गायक वैभव माळी, पखवाज शशिकांत माने, सतीश ओव्हाळ, बापू साबळे, बापू कसबे, चेतन आणि कलावंत म्हणून लोकनाट्य करणारी सुहास झेंडे, विजय उंबरे, सुगत सोनवणे, सुमेध चिलवंत, शुभम खोत, आलम शेख, विश्वनाथ काळे, अंकिता माने, अंबिका आगळे, वैष्णवी नागटिळक, निकिता साळुंखे, दिशा सोनटक्के, वेशभूषा मंगल सतीश ओव्हाळ, प्रियंका पोतदार, रवींद्र सूर्यवंशी, संकेत नागणे आदी कलावंतांनी विश्व साहित्य संमेलनामध्ये सादरीकरण केले. त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले.  


 
Top