धाराशिव (प्रतिनिधी)- सत्याच्या बाजूने केलेले लेखन समाजाला पुढे नेते. त्यामुळेच संत साहित्याचे मोल शेकडो वर्षे टिकून आहे. समाज चांगल्या दिशेने जावा हाच साहित्याचा गाभा आहे. सत्याच्या बाजूने केलेले लेखन समाजाला नवी दिशा देते, नवी दृष्टी देते. दृष्टी सर्वाना आहे, पण साहित्यामुळे समाजाला दृष्टीपलीकडेही दिसू लागतं, असे विचार 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 02 फेब्रुवारी रोजी आयोजित 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, प्रमुख अतिथी तथा सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर, मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ. जयद्रथ जाधव, नितीन तावडे, प्राचार्य अनिल काळे यांची उपस्थिती होती. समारोपसत्रात सर्व विशेष अतिथींचा सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव आगळे तर आभार प्रदर्शन संजना काळे यांनी केले.