धाराशिव (प्रतिनिधी)- परिवर्तनाची पहाट आणण्याची ताकद कवितेत आहे. कवितेमुळेच लगेच क्रांती होते या भ्रमात मी नाही परंतुआ क्रांतीसाठी कविता ही मनोनुकुल भूमिका तयार करते असे मत कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांनी व्यक्त केले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 02 फेब्रुवारी रोजी आयोजित 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये प्रा. संध्या रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यात मराठवाड्यातील विविध विषयावरील विनोदी, सामाजिक, शेतकरी जीवन, अंतर्मुख करणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांनी वारसा ही चिंतनशील कविता सादर केली.
प्रकाश पेरतेय मी
आता उजलेलच गांव
पहाटेच्या ललाटावर
कोरीन माणूस
माझं नाव.
अशा भाषेत परिवर्तनाचा संदेश दिला.
सुरेश हिवाळे (परभणी) यांनी 'भारतीय' अभंगात
नको डावपेच | होऊ नये दंगा ॥
फडको तिरंगा | मनोमनी ॥
अशी भावना सादर केली.
प्रा. डॉ. अशोक पाठक (परतूर) यांनी
चला खुर्चीत जाऊन बसू
आणि खुदुखुदू हसू
ही विनोदी कविता सादर करून श्रोत्यांना खळखळून हसविले.
सरिता उपासे (उमरगा) यांनी कुणब्याची लेक या कवितेत
पार जन्मापासून हाय मातीशी हो नातं
राबराबुनी शेवटी झालं होत्याचं नव्हतं
तरी उभी राही बाय जरी आघात अनेक..
कुणब्याची लेक.. कुणब्याची लेक..
ही दर्दभरी कविता सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले. कविसंमेलनात बबन आव्हाड (परभणी), किरण निकम (वैजापूर), हरिष हातवटे (आष्टी), शिवाजी जोगदंड (उमरी), दिनेश शेळके (जालना), उषा भोसले (लातूर), प्रा. अशोक खेडकर (जालना), दिपमाला देशमुख (छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह मराठवाड्यातून आलेल्या कवींनी विविध विषयावरील कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली.