धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा मध्यम आणि लहान व्यावसायिक ,शेतकरी आणि कामगार आहेत असे राहुल गांधी वारंवार सांगत  आहेत. झोमॅटो, स्विगी, सारख्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांची ससेहोलपट, मेकॅनिक, भाजी विक्रेते, ट्रकचालक अशा लाखो लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे जे मुद्दे राहुल गांधींनी आत्तापर्यंत मांडले, तेच मुद्दे अर्थसंकल्पात आले आहेत. अर्थात यावर करायचे उपाय मात्र राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे नाहीत. कारण तसे केले तर, बड्या मित्रांना मिळत असलेल्या सवलती आवराव्या लागणार असल्याची  टीका अर्थसंकल्पावर काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे.

नोट बंदी, चुकीचे जीएसटी आणि अंधाधुंद लॉकडाऊन यामुळे, वेगाने दौडु लागलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. बेरोजगारी वाढली. वाढती महागाई आणि घटणारे उत्पन्न यामुळे मध्यमवर्गाचेही खिसे रिकामे झाले आहेत. टॅक्स मध्ये सवलतींनी खुश होऊन, महागाईची आणि बुडणाऱ्या बँकांची टांगती तलवार मध्यमवर्ग विसरेल हा सरकारचा भ्रम आहे.

शेतीमालाला योग्य भाव, मध्यम व लहान व्यवसायिकांना पाठबळ, महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न आणि तरतूदी यानेच ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला गती येईल. हे राहुल गांधी सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची प्रतिमा खालावलेली आहे, त्यामुळे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर कडक निर्बंध घालण्याचा विचार मांडला आहे. अशा परिस्थितीत, देशांतर्गत  आधीच ठप्प झालेल्या उत्पादनांची निर्यात कशी काय वाढणार ? यावर काहीच भाष्य या अर्थसंकल्पात नाही.

स्मार्ट सिटी, स्टार्ट अप्स, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट अशा मागे केलेल्या घोषणांचे काय झाले? याचा कसलाही आढावा तर सोडा, उल्लेख सुद्धा  केला नाही. मुंगेरीलाल के हसीन सपने बघण्यात आणि दाखवण्यात मश्गूल असलेलं सध्याचं केंद्र सरकार वास्तवात जागं होऊन काही चांगलं करेल याबद्दल लोकांचा भ्रमनिरास झालेला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसलेला आहे. मोदींनी आणि निर्मला सीतारामन यांनी गरीबांच्या कल्याणाचा आव आणला आहे खरे. पण, फक्त बिहार, ईशान्येकडील राज्ये, आणि अंदमान निकोबार बेटांचा उल्लेख करून प्रिय मित्रांची झोळी आता कुठून भरणार आहेत याची झलक दाखवली असल्याचे डॉ.स्मिता शहापूरकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

 
Top