लोहारा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीसह बळकटीकरणावर भर दिला जात आहे. अशी माहिती संघटन पर्व कार्यक्रमात नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियान अधिक जोमाने राबवण्यासाठी लोहारा येथे पक्षाच्या पदाधिकायांची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे बहुजन कल्याण, दुग्धव्यवसाय आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पक्षसंघटनेचे बळकटीकरण, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि आगामी कार्ययोजना यावर सखोल चर्चा झाली. पक्ष अधिक सक्षम करून जनसेवेच्या दिशेने पुढे जाण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भाजपला अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला मराठवाडा संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, गुलचंद व्यवहारे, उमरगा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे उपस्थित होते. या बैठकीस भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. भाजपच्या संघटन पर्व मोहिमेअंतर्गत लोहारा येथे पक्षविस्तारासाठी करण्यात येणारे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.