तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरामध्ये विजबील वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडुन होत असलेल्या दुजाभावाबाबत संबंधीतावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी मनसेचे निलेश परमेश्वर यांनी कार्यकारी अभियंता उपविभाग तुळजापूर यांना निवेदन देवून केली आहे.
तुळजापूर शहरामध्ये अंदाजे 3,75,00,000- ( पावणे चार कोटी) विजबील थकीत असलेल्या ग्राहकांची माहीती अर्जदार यांनी माहीती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागणी केलेली होती. सदर माहीती अर्जदार यांना प्राप्त झाली असुन, तुळजापूर शहरामध्ये दोन लाख पेक्षा जास्त विजबील थकीत असलेले ग्राहक 10 व एक लाख रुपये पेक्षा जास्त विजबील थकीत असलेल्या ग्राहकांची संख्या 91 आहे. आपल्या कार्यालयामार्फत विजबील वसुलीसाठी असलेले कर्मचारी व अधिकारी हे ज्याच्याकडे जास्तीचे विजबील थकीत आहे अशा व्यक्तीचे वीज बील वसुली न करता ते केवळ गोरगरीब व कष्टकरी व्यकतीचे ज्यांच्याकडे केवळ दहा ते पंचेवीस हजार रुपये थकबाकी असलेल्या ग्राहकांकडुन सक्तीने दमदाटी करुन त्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पन्नास हजार ते लाखो रुपयांचे थकीत बील आहे अशा व्यक्तीकडुन वसुली करण्यास किंवा वीज तोडण्यास धजावत नाहीत. त्यामुळे आपल्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडुन थकीत विजबील वसुली व वीज तोडणीमध्ये दुजाभाव केला जात आहे. यासाठी आपण पुढील प्रमाणे कार्यवाही अनुसरावी. त्वरित जनता दरबार भरण्यात यावा. शहरांमध्ये महावितरण चालू असलेली विज वसुली व वीज तोडणी याच्यातून कमी विज बील असलेल्या ग्राहकांना वीज बील भरण्याकरीता वेळ देण्यात यावा. तरी याची दखल न घेतल्यास मनसे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.