धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव रेल्वेस्थानक प्रस्तावित होते त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. नवीन पर्यायी रेल्वेमार्ग (लूप लाईन) उभारला जाणार आहे आहे. प्रवासी बांधवांसह रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्याच्या वरून आणि खालून जाणाऱ्या पुलांची संख्येत वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
या रेल्वे मार्गासाठी सोलापुर शहरातील जागा संपादन करताना तिथले प्रचलित दर गृहीत धरले आहेत. तसेच वाढलेल्या कामांच्या साठी लागणारे वाढीव भूसंपादन या सर्व बाबींचा विचार करत भूसंपादनासाठी तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. ठाकरे सरकारने राज्य हिस्स्याचा पन्नास टक्के वाटा न दिल्याने रेल्वेमार्गाचे काम अडीच वर्ष रखडले. त्यामुळे प्रकल्प किंमतीत 117.49% म्हणजेच रु.1063.23 कोटींची वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 900 कोटी रूपयांच्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी आता 3000 कोटी रुपये लागणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव प्रकल्प किंमतीनुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी. अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
या नवीन रेल्वेमार्गामुळे प्रवासी संख्या निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे पायाभूत सोयीसुविधांची अडचण होऊ नये याकडे आपण लक्ष वेधले होते. त्यानुसार धाराशिवचे रेल्वेस्थानक आता अधिक सुसज्ज आणि अद्ययावत होणार आहे. मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत 4000 चौरस मीटरवरून तब्बल 12,630 चौरस मीटर होणार आहे. एकंदरीत मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार 11,400 चौरस मीटर मान्यता असलेल्या सर्व्हिस इमारती सुधारित आराखड्यानुसार 17,600 चौरस मीटर होणार आहेत. वेगात जाणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्यांना तात्काळ मार्ग मिळावा यासाठी आवश्यक असणारी पर्याय व्यवस्थाही हाती घेण्यात आली आहे.
त्यानुसार यार्डाच्या आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूप लाईन अंथरली जाणार आहे. विविध रस्त्यांखालून जाणाऱ्या पुलांची संख्या यापूर्वी 20 होती. त्यात वाढ करण्यात आली असून 31 रस्त्यांच्या खालून रेल्वेमार्गासाठी पूल तयार केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाचा पुलाची लांबीदेखील वाढणार आहे. 385 मीटर ऐवजी आता हा पूल 399 मीटर लांबीचा असणार आहे. याव्यतिरिक्त प्रवाशी बांधवांसाठी अनेक महत्वपूर्ण सोयीसुविधांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह जमिनीखालील आणि जमिनीवरील पाण्याच्या मोठ्या टाक्यांची उभारणीही केली जाणार आहे. यापूर्वी ही सर्व कामे 2,87,872 चौरस मीटर जागेवर केली जाणार होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून 4,44,922 चौरस मीटर क्षेत्रावर या सर्व सोयीसुविधा साकारल्या जाणार आहेत. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची संख्याही 342 वरून 373 एवढी करण्यात आली आहे. त्यासाठी सुधारित आराखड्यानुसार 3000 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे रेल्वे बोर्डाने सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
रेल्वेमंत्री वैष्णव यांना मुख्यमंत्र्यांचे पत्र : आमदार पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून या प्रकल्पाकडे लक्ष दिले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याबरोबर त्यांनी प्राधान्याने हा विषय अजेंड्यावर घेतला. तुळजाभवानीच्या चरणी हा रेल्वेमार्ग समर्पित करण्यासाठी तातडीने राज्याच्या वाट्याचा 50 % हिस्सा देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 20 जानेवारी रोजी पत्र लिहून सुधारित किंमतीनुसार सादर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार केंद्राच्या वाट्याचा निधी लवकर देण्यात यावा. अशी मागणी केली असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.