धाराशिव (प्रतिनिधी)-  येडशी, लातूर होऊ घातलेल्या महामार्गावरील तेरणा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांचे पाट-पाणी जाण्यासाठी पाईपलाईन टाकावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. इस्लामपूर (जि. सांगली) येथे भेट घेवून ही मागणी करण्यात आली. तसेच यावेळी येडशी, लातूर महामार्ग कामास मंजुरी दिल्याबद्दल दुधगावकर यांनी त्यांचे आभार मानले.

याबाबत मंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, येडशी, लातूर होऊ घातलेल्या महामार्गावरील जवळा दुमाले ते दुधगाव या दरम्यान तेरणा नदी वाहते आहे. सदरील ठिकाणी सध्या ये-जा करण्यासाठी पूल आहे. परंतु त्याची उंची अत्यंत कमी असून त्याखालील असलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यामध्ये पुलावरून पाणी सातत्याने वाहत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या गावांना आपल्या विभागामार्फत प्रसिद्ध झालेला नवीन निविदेच्या कामांमध्ये तेरणा नदीवरील पुलाची उंची दहा फूट वाढविण्यात यावी. तसेच या महामार्गावरील जवळा दुमाले ते दुधगाव यादरम्यान तेरणा नदीपासून पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर सौंदना रस्ता असून सौंदना, शेलगाव, जवळा, खामगाव, वाघोली तेथील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता देण्यात यावा. त्याचप्रमाणे शेतातील पाट-पाणी जाण्या येण्यासाठी छोट्या पुलाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तरी वरील मार्गाचे काम चालू होण्याअगोदर संबंधितांना शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासंदर्भात आदेशित करावे, अशी मागणी दुधगावकर यांनी या निवेदनात केली आहे.

 
Top