धाराशिव (प्रतिनिधी) - पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हे सर्वसामान्य व्यक्तीच्या समस्यांना वाचा फोडतात. त्यामुळेच जनतेच्या समस्या सरकार दरबारी पोहोचतात. त्या माध्यमातून विकास कामे करण्यास दिशा मिळते. त्यामुळे सर्व प्रकारची विकास कामे करण्यामध्ये लोकप्रतिनिधींची जशी गरज असते. अगदी तशीच पत्रकारांची देखील गरज असते असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी केले.
व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच कार्डचे वितरण पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेनेचे राज्य समन्वयक तथा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे, शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, राज्य कार्यवाह अमर चोंदे, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, पोस्ट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक चंद्रकांत झेंडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, पत्रकारांना निवाससाठी जागा, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सर्व बसमध्ये प्रवासाची सुविधा व जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना कक्ष उपलब्ध करून देण्यात यावे या पत्रकारांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत. याचा मी सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे माझे वडील उपसंपादक होते. त्यामुळे पत्रकारांना न्याय देण्यासाठी माझी नैतिक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिव येथील पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बसण्याची परवानगी नव्हती. पत्रकारांनी माझ्याकडे ती मागणी करताछ मी त्यांना सभागृहात प्रवेश दिला असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे एसटीची सेवा ही सर्वसामान्यांना मिळणे आवश्यक असून एसटी तेथे एसटी म्हणजेच आदिवासी बांधव जिथे पाड्यावर राहतात, तिथे माझी एसटी गेली पाहिजे असा माझा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार कैलास पाटील यांच्या संकल्पनेतून पत्रकारांना विमा सुरक्षा कवच काढून देण्याचा उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद व वाखाणण्याजोगे आहे. विशेष म्हणजे आमदार पाटील हे पत्रकारांना न्याय देण्याचे काम करीत आहेत असे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले. जिल्ह्यात जास्तीत जास्त विकास कामे करण्यासाठी चौथ्या स्तंभाला सोबत घेऊन कामे केल्यास नक्कीच विकास झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच तुळजापूर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय आजच झाला असून तेथे रुग्णांना पाच लाख रुपयांचे मोफत उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे तुळजापूर या तीर्थस्थळी ड्रग्ज कसे आले त्याचा तपास करून त्यांच्या येत्या ७२ तासांमध्ये मुसक्या आवळाव्यात असे थेट निर्देश त्यांनी दिले. तसेच तुळजाभवानी मंदिराच्या कामास सुरुवात करायची असून कळस व इतर कामे दर्जेदार करावीत असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले. तर खा राजेनिंबाळकर म्हणाले की, गावातील सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. मात्र हल्ली पत्रकारावर दबाव टाकला जात असून हे प्रगल्भ लोकशाहीसाठी घातक आहे. तसेच जिल्ह्याचे असंख्य प्रश्न आहेत, त्याला न्याय द्यायची भूमिका पत्रकारांची असली पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर निवडणुकीपूर्वी तुळजाभवानी मंदिरसाठी प्रसाद योजनेची घोषणा केली होती. मात्र त्या योजनेच्या माध्यमातून एक रुपया तरी आला का ? दररोज अनेक आश्वासने व घोषणा दैनिकांच्या माध्यमातून दिल्या जातात. परंतू त्याची शून्य अंमलबजावणी असेल तर जनता मूर्ख की आश्वासन देणारी मूर्ख असा हल्ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर त्यांचे नाव न घेता चढविला. विशेष म्हणजे रेल्वेची जागा आणि त्या जागेवर माथेरान करायचे अशी पुन्हा नवीन घोषणा असा टोला लगावला. तसेच रेल्वे विभागाची जागा त्या ठिकाणी माथेरान करायचे असा टोला लगावत घोषणा करणे सोपे. पण अंमलबजावणीचे काय असा प्रश्न विचारत केलेल्या कामाचे जरूर घ्यावे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील काहीजण सभागृहामध्ये शपथ घेतात. आता गावचा विकास करण्यासाठी विकास निधी आमच्या पक्षाचा असाल तरच देऊ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या आ राणेंचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच लोकप्रतिनिधींनी बोलताना खरे असेल तरच बोलावे. जर लोकप्रतिनिधी भरमसाठ आश्वासने देत असतील तर त्या आश्वासनांचे काय झाले ? याचा जाब पत्रकारांनी लोकप्रतिनिंना विचारला पाहिजे. याबरोबरच जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आणण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी ताकतीने प्रयत्न करू असे सांगत संघर्ष करणाऱ्या व संघर्षाचा प्रतिकार करणाऱ्यांचाच इतिहास सांगितला जातो असे खा राजेनिंबाळकर यांनी सांगितले. तसेच आ. पाटील म्हणाले की, जास्तीत जास्त पत्रकारांनी पत्रकारांनी विमा सुरक्षा कवच या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच आम्ही लोकप्रतिनिधी जे आश्वासने देतो त्याचा पाठपुरावा पत्रकारांनी करावा. आपल्या जिल्ह्याच्या विकासाबाबत आम्हाला व सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच निवडणुकीच्या काळात सोयाबीन व इतर पिकांना हमीभाव देण्याचे आश्वासन दिले, २३ टीएमसी पाणी आणण्याचे आश्वासन दिले, मेडिकल कॉलेज पूर्ण क्षमतेने चालू झाले आहे का असा प्रश्न विचारीत निवडणुकीनंतर शेतमालाला भाव मिळाला का ? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला. जिल्ह्याचे मागासले पद दूर करण्याचे प्रयत्न करावेत. याबरोबरच सर्वसामान्य जनतेचा आवाज उठविला पाहिजे, लोकप्रतिनिधींना बोलते केले पाहिजे असे आवाहन करीत ते म्हणाले की, ड्रग्स प्रकरणी कारवाई झाली का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे पत्रकारांनी सामाजिकदृष्ट्या प्रश्न विचारून आवाज उठविला. तसेच बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारांना जो वसा घालून दिलेला आहे, तो तसाच चालवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी २०५ पत्रकारांचा अपघात विमा उतरविण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन प्रवक्ता मनोज जाधव यांनी व उपस्थितांचे आभार महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे यांनी मानले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जुबेर शेख, रेडिओ विंगचे रमेश पेठे, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ कांबळे, शिवशंकर तिरगुळे, सरचिटणीस आकाश नरोटे, कोषाध्यक्ष रवींद्र लोमटे, कार्यवाहक दयानंद काळुंके, जसवंतसिंह बायस, संघटक रामराजे जगताप, अमोल पाटील, रवींद्र तांबे, काकासाहेब कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सलीम शेख, तालुकाध्यक्ष रामेश्वर शिंदे (धाराशिव), रणजीत गवळी (कळंब), विलास गपाट (वाशी), चंद्रमणी गायकवाड (भूम), प्रमोद वेदपाठक (परंडा), ज्ञानेश्वर वाघमारे (तुळजापूर), गिरीश भगत (लोहारा) व बालाजी माणिकवार (उमरगा) आदींसह व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.