धाराशिव (प्रतिनिधी)- भोगवाटादार वर्ग-दोनचे रुपांतर वर्ग-एक मध्ये हस्तांतरण करताना संबंधीताकडुन शर्तभंगचा नजराणा फक्त एकाच वेळी भरण्याबाबत स्पष्ट सूचना मुख्यमंत्री म्हणून आपण हिवाळी अधिवेशनाच्यावेळी सभागृहात दिल्या होत्या. मात्र अजूनही त्या निर्णयावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे याबाबत लवकर आदेश निर्गमित करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना तस पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, इनाम जमिनीच्या मदतमाश या प्रकारातील भोगवाटदार वर्ग- दोन जमीनीचे रुपांतर वर्ग-एक मध्ये करण्यासाठी शर्तभंग नजराणा पाच टक्के इतका घेण्याबाबतचे विधेयक 17 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना मी अशी सुधारणा सुचवली होती की, एकाच जमीनीचे हस्तांतर अनेक वेळा झालेले असल्यास अध्यादेशामधील संदिग्धतेचा आधार घेऊन अधिकारी जेवढ्या वेळेस शर्तभंग झाला असेल तेवढया वेळेस नजराणा रक्कम भरावी लागेल असे संबंधीतांना सांगत आहेत. त्यामुळे जमीनीचे हस्तांतर कितीही वेळा झाले असले तरी शर्तभंगाची नजराणा रक्कम एकाच वेळी भरुन घ्यावी अशी मागणी मी केली होती. यावर आपण स्वतः सभागृहाला आश्वासीत केले होते की, शर्तभंग कितीही वेळा झाला असता तरी एकाच वेळी पाच टक्के नजराना रक्क्म भरुन ही जमीन वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यात येईल. आपण दिलेल्या अश्वासनानुसार अद्यापपर्यंत महसुल विभागाकडुन आदेश निर्गमित करण्यात आले नाहीत. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आदेश तात्काळ निर्गमीत करण्यास संबंधितांना आदेशीत करावे. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.