तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी प्र.प्राचार्य डॉ.जीवन पवार, गुरुदेव कार्यकर्ते अंकुश बेळंबे, तुकाराम शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. पवार यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, हजारो वर्षांच्या सामाजिक, राजकीय गुलामगिरीतून महाराष्ट्रातील जनतेस मुक्त करण्यासाठी शिवरायांनी आपले आयुष्य खर्ची घातले. एका आदर्श राज्यवस्थेची स्थापना केली. हे राज्य न्यायाचे, नितिचे, माय माऊलींच्या सुरक्षिततेचे, आणि परधर्मसहिष्णुतेचे राज्य होते. धर्माधंतेला,भ्रष्टाचाराला स्वराज्यात थारा नव्हता. शेतकरी जगला तर राज्य जगेल ही भावना महाराजांनी काटेकोर जपली. शत्रू पक्षातील स्त्रियांना साडी चोळी देऊन सुखरूप घरी पाठवावे हे माँ जिजाऊ साहेबांचे संस्कार स्वराज्याच्या मातीत रुजवले. समाजाला, आजच्या व्यवस्थेला या गोष्टीचा विसर पडु नये असा संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जे. बी. क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रा. व्ही. एच. चव्हाण यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top