भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथील जवान महेश रामकृष्ण देशमुख (31) हे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असताना शहीद झल्याची घटना शुक्रवार दि.31 रोजी सकाळी घडली आहे. महेश देशमुख हे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील भारतीय सैन्य दलाच्या कार्यालयामध्ये क्लर्क या पदावर कार्यरत असताना त्यांना अचानक छातीमध्ये दुखु लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ही महेश यांना वाचवण्यात यश आले नाही. शेवटी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केल्याचा फोन त्यांच्या कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्याने ईट ग्रामपंचायतीच्या सरपंचाना केल्याचे सांगीतले. 

महेश देशमुख यांनी घरच्या अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारतीय सैन्य दलामधे प्रवेश केला होता. ते 2011 मध्ये सैन्य दलामध्ये भरती झाले होते.त्यांच्या पश्चात आई-वडील दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. महेश देशमुख शहीद झाल्याने ईट गावावर शोक कळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शनिवार दि.01 रोजी भारतीय सैन्य दलाचे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील कार्यालयात मानवंदना देऊन भारतीय सैन्य दलाच्या मोटारीने रविवारी पहाटे त्यांच्या ईट या गावी आणले. रविवारी सकाळी 11 वाजता ईट येथे शासकीय इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली. शनिवारी ईटचा आठवडी बाजारही असतो तो बाजारही महेश देशमुख शहीद झाल्यामुळे सोमवारी भरवण्यात येणार आहे. तर शनिवार दिवसभर व रविवारी दुपारी अंत्यसंस्कार होईपर्यंत ईट ग्रामस्थांनी आपली हे दुकाने बंद ठेवून शहीद महेश देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली. भारत माता की जय, शहीद महेश देशमुख अमर रहे घोषणा देत त्यांच्या पर्थिवाची मिरवणूक त्यांचे घर ते संपूर्ण गावभर काढण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांची उधळण केली व शहीद महेश देशमुख यांना शेवटचा निरोप दिला. धाराशिव पोलीस दलाकडून बंदुकीच्या फैऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. अत्यंत दुःखद वातावरणामध्ये शहीद महेश देशमुख यांना शेवटचा निरोप देण्यात आला.


 
Top