धाराशिव (प्रतिनिधी)-  डिसेंबर महिन्यात ड्रग्ज विक्रीबाबत आपल्याला पहिली ठोस माहिती मिळाली. या विषयाची दाहकता लक्षात घेत तुळजापूर शहरातील माता-भगिनींना आपण दिलेल्या शब्दानुसार  जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देत सूचना दिल्या. त्यांनीही गांभीर्याने दखल घेत प्रकरणाचे धागेदोरे लावण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले. दुर्दैवाने दोन वेळा यश मिळाले नाही, परंतु तिसऱ्यांदा मात्र यश मिळाले. मुंबई आणि तुळजापूर शहरातील कोणाचे यात संबंध आहेत याचे अनेक पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे. पोलीस सध्या सखोल तपास करीत असल्याने त्यावर अधिक बोलणे योग्य राहणार नाही. आरोपी कोण आहे? कोणत्या पक्षाचा आहे? जवळचा आहे की दूरचा आहे याचा विचार न करता कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत कोणाकडे आणखी माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी न डगमगता आपल्याला माहिती द्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

शहरवासीयांनी ड्रग्ज विरोधात पुकारलेल्या आंदोलनस्थळी शुक्रवारी भेट दिली. त्यांना वरील घडामोडींबद्दल अवगत करून यापूर्वीच्या घटनाक्रम सांगितला. 28 डिसेंबर रोजी पहिल्यांदा आपल्याला याबाबत ठोस माहिती मिळाली. तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपण अवगत केले. त्यानंतर त्यांची भेट घेऊन प्रकरणाची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली. 

जानेवारी महिन्यात प्रयत्न करूनही या पथकाच्या हाती म्हणावे तसे धागेदोरे लागले नाही. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी आपल्याला आणखी माहिती मिळाली व ती आपण पोलीस अधिक्षकांना दिली. त्यानुसार त्यांनी साध्या वेशातील विशेष पोलीस पथक पाठवले. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा माहिती मिळाली. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे तामलवाडी परीसरात पोलिसांनी यशस्वी कारवाई करीत ड्रग्जचा साठा जप्त केला व आरोपीना अटक केली. 


तुळजापूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे

तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदीराच्या विकास आराखडयास शासनाने मंजुरी दिली आहे. यासोबत धाराशिव-तुळजापुर- सोलापुर या रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.आगामी काळात ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे मंदीर सुरक्षेच्या दृष्टीने व दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या सोईसाठी  तुळजापुर येथील सध्याच्या पोलीस ठाण्याचे विभाजन करून तुळजापुर शहर व तुळजापुर ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तुळजापुर मंदीर चौकीमध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याची नेमणुक करून तेथेही अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तुळजापुर शहरासाठी स्वतंत्र वाहतुक शाखा निर्माण करून, आवश्यकतेनुसार कर्मचारी व साहीत्यसामुग्री उपलब्ध करून देण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत रीतसर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली.


 
Top