धाराशिव (प्रतिनिधी) - आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत व मराठा जन आक्रोश आंदोलनाच्या नावावर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करणाऱ्या ब्लॅकमेलरला मराठा आंदोलकांनी भर चौकात चोप दिला आहे. तसेच त्यास आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये बसविले असून त्याच्या फोन कॉल्स व बँक खात्याची डिटेल्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी आमदार धस यांना याबाबत फोनवर अवगत केले असता त्यांनी त्या ब्लॅकमेलरला आष्टीला घेऊन या. मी त्याला कसा तुडवितो ते पहा ? असे सांगितले. मात्र त्या ब्लॅकमेलरने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मी आमदार धस यांचा कार्यकर्ता आहे. मराठा जन आक्रोश मोर्चा कार्यक्रमासाठी पैसे द्यावेच लागतात, असा दम देत लाखो रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे हे गोरख धंदे गेल्या अनेक वर्षापासून हा राजरोसपणे करीत असल्यामुळे नाहकपणे मराठा समाजाची व आमदार सुरेश धस यांची बदनामी होत आहे.
धडाकेबाज कामगिरी करणारे आमदार म्हणून आमदार सुरेश धस यांचा दरारा संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर करून धाराशिव शहरातील आशिष नामक ब्लॅकमेलरने धाराशिव शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मराठा आंदोलन व जन आक्रोश कार्यक्रम करायचा आहे. मी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे असे सांगून त्यांच्याकडून तो दर महिन्याला खंडणी वसूल करीत असल्याची माहिती आहे. जर अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली तर मी तुमचे नाव आमदार धस यांना सांगून तुमच्या कामाची व तुमची चौकशी लावतो अशी धमकी देत असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. आमदार धस हे तक्रार आली की त्या तक्रारीवर चौकशी करण्याची मागणी सभागृहात करीत असल्यामुळे अनेक अधिकारी त्यांचे नाव घेताच दचकतात. याचाच गैरफायदा घेऊन यांनी मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने माया जमवल्याची खात्रीलायक माहिती मराठा आंदोलकांना मिळाली. मात्र तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने या कार्यकर्त्यांना समाजाच्या नावावर खंडणी वसुली व समाजाची होणारी बदनामी याची प्रचंड चीड आल्यामुळे त्यांनी त्याला भर रस्त्यावर चोप देत त्याची धुलाई केली.